*बारामतीत बांधकाम कामगारांची ‘तारीख पे तारीख’; ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळूनही संचासाठी भटकंती, प्रशासनाचा ढिसाळ कारभार*
बारामती (प्रतिनिधी):
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना घरगुती उपयोगी वस्तूंचा संच (भांडी) आणि सुरक्षा किट मोफत दिले जाते. मात्र, बारामती तालुक्यात या संचाचे वाटप प्रशासकीय नियोजनशून्यतेमुळे कामगारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन पहाटेपासून रांगेत उभे राहणाऱ्या गरिबांच्या पदरात केवळ नव्या तारखेचे कूपन पडत असून, त्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
शासनाच्या नियमानुसार, कामगारांना या संचाचा लाभ घेण्यासाठी महाईसेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयातून ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मिळालेल्या तारखेला कामगार आवश्यक कागदपत्रांसह वाटप शिबिराच्या (कॅम्प) ठिकाणी जातो. तिथे तासनतास रांगेत उभे राहून बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाते. ऑनलाइन पावतीवर स्पष्ट लिहिलेले असते की, “ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे, त्या दिवशी कॅमच्या ठिकाणाहून भांडी घेतल्याशिवाय जाऊ नये.”
मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती याउलट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांचे बायोमेट्रिक घेतले जाते, त्यानंतर रिकाम्या भांड्यांच्या सेटसोबत किंवा पेटीसोबत त्यांचा फोटो काढून शासनाच्या वेबसाईटला अपडेट केला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांना तो संच दिला जात नाही. त्याऐवजी त्यांना पुन्हा एकदा एक छोटे कूपन दिले जाते, त्यावर दुसरी तारीख लिहून त्यांना पुन्हा येण्यास सांगितले जाते. त्या दुसऱ्या तारखेला गेल्यावर अनेकदा पुन्हा तिसरी तारीख दिली जाते. हा ‘तारीख पे तारीख’ चा खेळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
मजुरी बुडवून पहाटेपासून रांगेत
बांधकाम कामगार हा रोज काबाड कष्ट करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत असतो. संच मिळण्याच्या आशेने तो आपली दिवसाची मजुरी बुडवून पहाटे तीन वाजेपासून कॅम्पच्या ठिकाणी हजर राहतो. बारामती तालुक्यातील कॅम्पच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, जेवण किंवा सावलीत बसण्याची कोणतीही सोय नाही. एवढ्या खराब परिस्थितीत उपाशीपोटी कामगार रांगेत उभा राहतो. दिवसभर रांगेत उभे राहूनही संध्याकाळी हाती संचाऐवजी केवळ कूपन पडत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यातच तिथले कर्मचारी कामगारांना तुच्छ लेखून ‘अरेरावी’ची भाषा वापरत असल्याच्या तक्रारीही कामगारांनी केल्या आहेत.
एजंट सक्रिय; १००० ते ३००० रुपयांत संच थेट घरपोच
एकीकडे गरीब कामगार नियमाने रांगेत उभा असूनही त्याला संच मिळत नाही, तर दुसरीकडे बारामती तालुक्यात एजंट यंत्रणा सक्रिय झाली आहे. हे एजंट १,००० ते ३,००० रुपये घेऊन कामगारांची पिळवणूक करत संच थेट घरापर्यंत पोहोचवत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना रांगेत न उभे राहता वस्तू मिळत आहेत, तर गरीब मात्र वंचित राहत आहे.
बोगस कामगारांचा सुळसुळाट; बागायतदार आणि बंगलेवाले घेतायत लाभ
सर्वात गंभीर बाब म्हणजे, बारामती तालुक्यातील काही गावांमध्ये बोगस कामगारांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. जे लोक प्रत्यक्षात बांधकाम कामगार नाहीत, अशांनी ९० दिवसांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून नोंदणी केली आहे. ज्यांच्याकडे स्वतःची बागायती शेती आहे, चारचाकी गाड्या आहेत आणि मोठे बंगले आहेत, असे लोक स्वतःला कामगार दाखवून शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत.
केवळ वस्तूंचा संचच नाही, तर कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिपचा लाभही हे श्रीमंत बोगस कामगार घेत आहेत. यामुळे ज्या खऱ्याखुऱ्या गरीब बांधकाम कामगाराला हा लाभ मिळणे आवश्यक आहे, तो यापासून वंचित राहत आहे. फॉर्म भरणारे अनेक एजंट कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने प्रशासकीय यंत्रणाही त्यांच्यावर दबाव आणण्यास किंवा त्यांची चौकशी करण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे.
मागणी:
प्रशासनाने तातडीने या अनागोंदी कारभारात लक्ष घालून, ज्या दिवशी अपॉइंटमेंट आहे त्याच दिवशी कामगारांना संच उपलब्ध करून द्यावा. तसेच, तालुक्यात वाढलेल्या बोगस कामगारांची आणि एजंट गिरीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून खऱ्या गरजवंत कामगारांना न्याय मिळेल.
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























